"पाडळी शिंदेतील खुनाचा अवघ्या ४ तासांत उलगडा; एसपी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रुपेश शक्करगेंची दमदार कामगिरी!

श्वानपथक थेट आरोपीच्या घरापर्यंत पोहोचले; करंट लागून बकरी मेल्याच्या वादातून निर्घृण हत्येचा पर्दाफाश"
 
देऊळगावराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगावराजा तालुक्यातील पाडळी शिंदे गाव आज पहाटे एका निर्घृण खुनाने हादरून गेले. मच्छिंद्र उर्फ छगन तुकाराम मोरे (वय ५५) यांची डोक्यात काठीने प्रहार करून हत्या करण्यात आली. घटना उघडकीस आल्यानंतर आरोपी पसार झाल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या अचूक मार्गदर्शनाखाली आणि अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी अवघ्या चार तासांत खुनाचा उलगडा करत आरोपींना बेड्या ठोकल्या. या जलद कारवाईमुळे बुलढाणा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आज सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास मच्छिंद्र मोरे यांचा खून झाल्याची माहिती अंढेरा पोलिसांना मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली. बुलढाण्यावरून फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथकालाही घटनास्थळी बोलावण्यात आले. दुसरीकडे ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी आपल्या गोपनीय यंत्रणेला कामाला लावत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी सुरू केली.

तपासादरम्यान काही संशयित पोलिसांच्या रडारवर आले. त्याचवेळी बुलढाण्यावरून आलेल्या पोलिस दलाच्या श्वानाने घटनास्थळावरून थेट एका संशयिताच्या घराच्या दिशेने धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि श्वानपथक या तिन्ही तपासाच्या धाग्यांनी एकाच व्यक्तीकडे बोट दाखवल्याने पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. कसून चौकशी करताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि खुनाचे गूढ काही तासांतच उलगडले.

करंट लागून बकरी मेली... अन् घेतला जीव!

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मच्छिंद्र मोरे यांनी घरात विजेच्या खांबावरून आकोडा टाकला होता. तीन दिवसांपूर्वी त्या आकोड्याचा करंट लागून आरोपी मच्छिंद्र माणिकराव सरोदे याची बकरी मृत्युमुखी पडली होती. यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. गावातील सरपंच आणि पोलिस पाटील यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटविल्याचे सांगितले जात असले तरी आरोपी सतत बकरीच्या मोबदल्यासाठी पैशांची मागणी करत होता.

काल सायंकाळी आरोपीने आपल्या मामेभावाला बोलावले. दोघांनी मिळून मच्छिंद्र मोरे यांना धमकावले. त्यानंतर रात्री दोघांनीही संगनमताने त्यांच्या डोक्यात काठीने जबर मारहाण करत त्यांचा खून केला आणि घटनास्थळावरून पसार झाले.

एसपींचे मार्गदर्शन, ठाणेदारांची रणनीती अन् श्वानपथकाची अचूक कामगिरी

या गुन्ह्याचा उलगडा करण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे प्रभावी मार्गदर्शन, ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी आखलेली तपासाची अचूक रणनीती, गोपनीय यंत्रणेची माहिती, सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण, फॉरेन्सिक पथक आणि बुलढाणा पोलिस दलाच्या श्वानपथकाची अचूक कामगिरी निर्णायक ठरली. अवघ्या चार तासांत आरोपींना अटक करून पोलिसांनी तपासातील आपली कार्यक्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली असून या कारवाईचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे.