लोणारमध्ये संतापजनक अत्याचार! ६० वर्षीय मातंग वृद्धेवर मारहाण व विनयभंग; रमेश मुळेवर अॅट्रॉसिटी गुन्हा...
Mar 17, 2026, 13:58 IST
लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : किरकोळ वादातून अमानुषतेची परिसीमा गाठणारी धक्कादायक घटना लोणार तालुक्यातील उदनापूर येथे उघडकीस आली आहे. जमिनीच्या वादात मध्यस्थी करण्यास नकार दिल्याच्या संतापातून एका ६० वर्षीय मातंग समाजातील वृद्ध महिलेला भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लोणार पोलिसांनी आरोपी रमेश अर्जुन मुळे याच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिला भिकाबाई लक्ष्मण नेमाडे (वय ६०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रमेश मुळे व त्याचा पुतण्या संजय मुळे यांच्यात काही दिवसांपासून संपत्तीच्या वादावरून वाद सुरू होता. या प्रकरणात समझोता घडवून आणण्यासाठी मध्यस्थी करावी, असा दबाव आरोपीकडून टाकण्यात येत होता. मात्र दोन्ही पक्षांत समझोता न झाल्याने आरोपीने हा राग मनात धरल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, १२ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास भिकाबाई नेमाडे या गावातील पिठाच्या गिरणीतून दळण आणण्यासाठी गेल्या होत्या. गिरणी बंद असल्याने त्या परतत असताना आरोपी रमेश मुळे याने त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर मागून येत त्यांच्या कमरेत जोरदार लाथ मारली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे वृद्ध महिला खाली कोसळल्या.
यानंतर आरोपीने खाली पडलेल्या महिलेवर लाथाबुक्क्यांचा मारा करत बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता जातीवाचक शिवीगाळ करत अत्यंत अश्लील व लज्जास्पद शब्दांचा वापर करून तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या झटापटीत महिलेच्या ब्लाउजची बाहीही फाटल्याचे सांगण्यात आले.
महिलेने आरडाओरड करून मदत मागितल्यानंतरही आरोपीने तिला जिवे मारण्याची तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवून तडीपार करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेमुळे उदनापूर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक संघटनांकडून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, लोणार पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम ७४, २९६, ११५(२), ३५२ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ३(१)(आर), ३(१)(एस), ३(१)(यु), ३(१)(डब्ल्यू)(आय), ३(१)(डब्ल्यू)(आयआय), ३(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास मेहकर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत.