संतापजनक! लाज सोडली; चुलत्याची नजर पुतणीवरच फिरली; लग्न करण्यासाठी पळवून नेली....धाड जवळची घटना
Jun 2, 2025, 08:56 IST
धाड(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हल्ली अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लग्नाला आलेल्या मुली आई-वडिलांचा विचार न करता प्रियकरासोबत बिनधास्त पळून जातात..प्रेमात वेड्या झालेल्या मुलींना प्रियकरच सर्वस्व वाटायला लागतो...केवळ मुलीच चुकतात असेही नाही, लग्नाळू मुले देखील प्रेमाच्या नावाखाली नको ते करतात..त्यांना नात्याचेही भान राहत नाही.. धाड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात चक्क चुलताच अल्पवयीन पुतणीच्या प्रेमात पडला.. ती आपल्या चुलत भावाची मुलगी आहे याचेही भान त्या भामट्या चुलत्याला राहिले नाही..त्याने लग्नाच्या आणाभाका घेतल्या, पुतणी सोबतच संसाराची स्वप्न रंगवली आणि पुतणीलाच लग्नासाठी पळवून नेले..या घटनेमुळे धाड परिसरात एकच खळबळ उडाली..
लग्नाच्या आणाभाका घेऊन पसार झालेला संबंधित युवक आणि त्याची अल्पवयीन चुलत पुतणी यांच्यात गेल्या काही दिवसांपूर्वी कथितपणे प्रेमसंबंध जुळले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून पीडितेच्या संपर्कात असलेल्या या प्रेमविराने पीडितेचा विश्वास संपादन केला. एवढ्यावरच न थांबता लग्नाच्या आना-भाका घेत, नाते संबंधातील सर्व मर्यादांचे उल्लंघन नव्हेतर भारतीय संस्कृती आणि सामाजिक नीतिमत्तेच्या विरोधात जाऊन अल्पवयीन पुतणीलाच पळवून नेले.
धाड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात ही घटना उघडकीस आली. पीडितेच्या कुटुंबियांनी पहाटे धाड पोलीस स्टेशन गाठून घडलेली घटना पोलीसांना सांगितली त्यानंतर अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणात अधीक वेळ न दडवता तत्काळ तपासचक्रे फिरवली. तांत्रिक व इतर माहिती काढली असता, पीडिता मेनगाव (जि. जळगाव) येथे आरोपीच्या मावशीच्या घरी असल्याचे समजल्याने पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे, पोलीस अंमलदार रविंद्र चव्हाण, खमाटे व महिला पोलीस अंमलदाराचे पथक मेनगावकडे रवाना केले. पथकाने पीडितेस सुखरुप ताब्यात घेऊन परत धाड पोलीस स्टेशन गाठले. मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता. अपहरणकर्ता दुसरा कोणी नसून पीडितेचा चुलत काका असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस फरार असलेल्या काकाचा शोध घेत आहेत.