भरधाव दुचाकी पुलावरून कोसळली, एक जण ठार तर एक जखमी; नांदुरा ते खामगाव रस्त्यावरील घटना !

 
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पुलावरून दुचाकी पडून एक जण ठार, तर एक जण जखमी झाल्याची घटना ११ डिसेंबर रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजेदरम्यान नांदुरा–खामगाव रोडवरील हॉटेल मराठा ते हॉटेल लाबेला दरम्यान घडली. श्रीकृष्ण नारायण घाईट (वय २७, रा. अलमपूर ) असे मृतकाचे नाव आहे. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अलमपूर, तालुका नांदुरा येथील श्रीकृष्ण नारायण घाईट (वय २७) हा अलमपूर येथून पुणे येथे जाण्यासाठी निघाला होता. त्यासाठी गावातील त्याचा मित्र विशाल सुधाकर बढे हा श्रीकृष्ण घाईट याची दुचाकी क्रमांक एमएच २८ बी एफ ६७६० ने नांदुरा येथून खामगावकडे त्याला खामगावपर्यंत सोडण्यासाठी जात होता. दरम्यान, हॉटेल मराठा ते हॉटेल लाबेला दरम्यान सुरू असलेल्या पुलावरील खड्ड्यात दुचाकी पडून अपघात झाला. या अपघातात श्रीकृष्ण नारायण घाईट हा गंभीररीत्या जखमी झाला, तर विशाल सुधाकर बढे हा जखमी झाला.या दोघांनाही प्रथम खामगाव येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र श्रीकृष्ण नारायण घाईट याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. अकोला नेत असताना त्याचा मृत्यू झाला, तर विशाल सुधाकर बढे याला किरकोळ उपचार करून घरी सोडण्यात आले.मृतक श्रीकृष्ण घाईट याचे शवविच्छेदन करून अत्यंत शोकाकूल वातावरणात १२ डिसेंबर रोजी अलमपूर येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील व दोन भाऊ असा आप्तपरिवार आहे.सदर तरुण रोजगारासाठी पुणे येथे जात असल्याचे आप्तेष्टांनी सांगितले. नांदुरा–खामगाव रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात होऊन तरुणाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप आप्तेष्टांनी केला असून, संबंधित कंपनीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी रास्त मागणी गावकरी करीत आहेत.