कार व दुचाकीच्या अपघातात एक ठार! मेहकर - चिखली मार्गावरील घटना! अंजनी खुर्द गावावर शोककळा....

 
 डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ): पाठीमागून येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक ५५ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाले. ही घटना मेहकर - चिखली मार्गावरील उसरण फाट्याजवळ १६ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. 
 मधुकर भगवान खेडेकर असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खेडेकर हे लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथील रहिवासी होते. ते शुक्रवारी सकाळी व्ययक्तिक कामानिमित्त आपल्या एमएच २८ सीए ७७८१ क्रमांकाच्या दुचाकीने पुंजाजी काळे यांच्याबरोबर पिंपळगाव उंडा गावाकडे निघाले होते. दरम्यान, एमएच १९ ईपी २२१४ क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, मधुकर खेडेकर हे जागीच ठार झाले. तर, पुंजाजी काळे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. मधुकर खेडेकर यांच्या निधनाने अंजनी खुर्द गावावर शोककळा पसरली आहे.