एकामागून एक १० सिलेंडरचा स्फोट..! खामगावातील श्रीहरी लॉन्स मध्ये भीषण अग्नितांडव; ५० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज...
Sep 25, 2024, 10:09 IST
खामगाव(भागवत राऊत: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव येथील श्रीहरी लॉन्स मध्ये काल,२४ सप्टेंबरच्या रात्री भीषण अग्नितांडव पाहायला मिळाले. खामगाव शहरातील नांदुरा रोडवर सुटाळा भागात असलेल्या श्रीहरी लॉन्स मध्ये भीषण आग लागली, या आगीत जवळपास ५० लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार रात्री ९ वाजेच्या सुमारास ही आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. लॉन्स मध्ये असलेल्या स्वयंपाक घरात १० सिलेंडर होते, या सिलेंडरचा देखील एकापाठोपाठ स्फोट झाला. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने परिसरातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना केल्या होत्या. खामगाव, शेगाव, नांदुरा, बुलडाणा येथून अग्निशामक दलाच्या गाड्या आग भिजवण्यासाठी खामगावात दाखल झाल्या होत्या.. लॉन्स मध्ये असलेले मंडप, बिछयातचे सामान यामुळे आग आटोक्यात आणणे कठीण होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी पहाटेपर्यंत परिश्रम घेत आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटने ही आग लागली असावी असा अंदाज आहे. या आगीत जवळपास ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.