ज्येष्ठा गौरीपूजनाच्या दिवशी काळाचा घाला; कंटेनर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ज्येष्ठा गौरीपूजनाच्या पावन पर्वावर बुलढाणा शहरात काळजाचा ठोका चुकवणारी दुर्दैवी घटना घडली. बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाई नगर परिसरात कंटेनर आणि दुचाकीची भीषण धडक झाली. या अपघातात आईचा जागीच, तर मुलाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. सणाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे माहोरा (कोलापूर) परिसरासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, MH 20 GZ 7698 क्रमांकाचा कंटेनर बुलढाण्याकडून धाडच्या दिशेने जात होता. त्याचवेळी MH 21 BB 2842 क्रमांकाच्या दुचाकीवरून एक मुलगा आणि त्याची आई येत होते. शिवसाई नगरजवळ दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की दुचाकीवरील अनुदाबाई जाधव वय वर्ष (६५) यांचा जागीच मृत्यू झाला तर अंकुश जाधव रा.माहोरा (कोलापूर), याला गंभीर दुखापत झाल्या मुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र रुग्णालयात पोहचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

अपघातानंतर कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. मात्र, परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत त्याचा पाठलाग केला आणि चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

घटनेची माहिती मिळताच बुलढाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केला आहे. कंटेनर चालक पोलिसांच्या ताब्यात आहे. सणाच्या दिवशीच मायलेकाचा मृत्यू झाल्याने माहोरा (कोलापूर) परिसरावर शोककळा पसरली आहे.