"बुलडाणा लाइव्ह"च्या बातमीनंतर अधिकाऱ्यांचा रातभर जागता पहारा! उपविभागीय अधिकारी मध्यरात्री धरणावर गेले! रेतीमाफिया दडून बसले! माफियांच्या काळ्या कमाईला ब्रेक.....

 

चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काल, सायंकाळी बुलडाणा लाइव्ह ने प्रकाशित केलेल्या एका वृत्तामुळे रेतीमाफियांमध्ये एकच खळबळ उडाली. "कोण धुतल्या तांदळासारखा? मग रेतीवाले मोकाट सुटतातच कसे? कलेक्टर साहेब हा घ्या पुरावा" या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करीत बुलडाणा लाइव्हने अवैध रेती वाहतूक होत असल्याचे जिवंत पुरावे व्हिडिओ फुटेजच्या माध्यमातून समोर आणले होते. त्यामुळे काल रातभर रेतीमाफियांवर जागता पहारा ठेवण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली, तसे आदेश स्थानिक प्रशासनाला थेट जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे स्वतः उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी देखील मध्यरात्री खडकपूर्णा धरणावर जाऊन पाहणी केली.शिवाय चिखली तहसील कार्यालय, देऊळगाव राजा तहसील कार्यालयाचे पथक देखील गस्तीवर होते, वाहतूक होणाऱ्या रस्त्यांवर ठाण मांडून होते. त्यामुळे एकही गाडी रेती घेऊन बाहेर येऊ शकली नाही, ज्या गाड्या रेती आणण्यासाठी गेल्या होत्या, त्यांनादेखील दडून बसावे लागले..एकंदरीत "बुलडाणा लाइव्ह"च्या एका वृत्ताने बोटीवाले, टिप्परवाले यांच्या एका रात्रीत होणाऱ्या जवळपास १५ ते २० लाखांच्या काळ्या कमाईला ब्रेक बसला..अर्थात या धंद्याला छुपा आशीर्वाद देणाऱ्यांचेही थोडेफार नुकसान झालेच..

 जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा होतो. अर्थात काहीं बड्या अधिकाऱ्यांचा याला छुपा आशीर्वाद असल्याचा संशय आहेच, त्याशिवाय एवढी हिम्मत रेतीमाफिया करतील तरी कसे? सामाजिक दबाव आल्यानंतर अधूनमधून टिप्पर पकडणे, बोटी बुडवणे अशा कारवाया झाल्याच्या बातम्या छापून आणल्या जातात. मात्र पुन्हा काही दिवस उलटत नाहीत तोच पुन्हा धंदा सुरू होतो. 
असे आहे आर्थिक गणित....
ज्यांच्या बोटी बुडवल्या जातात ते पुन्हा १५ ते २० लाख रुपये खर्चून नव्या बोटी आणतात..एवढं सहजा सहजी हे होत असेल का? एक बोटीवाला रेतीचे एक टिप्पर भरून देण्यासाठी साधारणत: ८ ते ९ हजार घेतो. एका बोटीवाल्याने ७ - ८ टिप्पर भरून दिले तरी रात्रीतून तो ५० ते ६० हजारांची काळी कमाई करतो, त्यातील ठराविक हिस्सा त्याला "आशीर्वाद" देणाऱ्यांही द्यावा लागतोच. ही परिस्थिती टिप्पर वाल्यांची देखील आहे अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान काल, "बुलडाणा लाइव्ह" ने प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर सगळ्या यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. रातभर महसूल प्रशासनाने पहारा दिला त्यामुळे काल रात्रीच्या धंद्यांवर अंकुश बसला..एकंदरीत महसूल आणि पोलीस प्रशासनाने ठरवलेच तर माफियांची कसली आली हिम्मत..हे सिद्धच झाले..त्यामुळे यापुढे देखील महसूल आणि पोलीस प्रशासनाने मनावर घेऊन माफियांची मुस्कटदाबी करावीच...तरच आम्ही म्हणू तुम्ही "धुतल्या तांदळासारखे"....