नायलॉन मांजाने दुचाकीस्वार युवकाचा गळा चिरला; मृत्यूशी झुंज सुरू...
Dec 17, 2025, 19:36 IST
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : नायलॉन मांजाने दुचाकीस्वार युवकाचा गळा चिरल्याची घटना संग्रामपूर तालुक्यातील वडगाव वाण परिसरात 16 डिसेंबर रोजी घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेला युवक सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. शेख अनिस शेख गफार रा.संग्रामपूर असे जखमी युवकाचे नाव आहे.
मंगळवारी सायंकाळी संग्रामपूर येथील शेख अनिस शेख गफार हा युवक आपले दैनंदिन काम आटोपून दुचाकीने घरी परतत असताना वडगाव वाण गावाजवळ अचानक रस्त्यात लटकलेल्या नायलॉन मांजाने त्याच्या गळ्यावर घाव घातला. क्षणात रक्तबंबाळ झालेल्या युवकाचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि तो गंभीर जखमी झाला. तात्काळ स्थानिकांनी धाव घेतली आणि युवकाला उपचारासाठी अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तो अतिदक्षता विभागात असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
बंदी असतानाही नायलॉन मांजाची खुलेआम विक्री सुरूच आहे. याआधीही अनेकांचे गळे कापले गेले, अपघात झाले, नायलॉन मांजाविरोधात तातडीची कठोर कारवाई झाली नाही, तर असे जीवघेणे प्रसंग थांबणार नाहीत, हेच या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे.
