

लावलेला खर्चही निघाला नाही, कर्ज कसे फेडणार! शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेतला; मोताळा तालुक्यातील पान्हेरा (खेडी) ची घटना...
Jan 25, 2025, 09:41 IST
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना पान्हेरा (खेडी) येथे घडली.
रामेश्वर विश्वनाथ राहणे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पान्हेरा (खेडी) येथील गट क्रमांक १९८, १९९ मध्ये त्यांची सहा एकर शेती आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. नापिकी व अतिवृष्टीमुळे शेतीला लावलेला खर्चही न निघाल्याने रामेश्वर राहणे आर्थिक संकटात सापडले होते. कर्ज कसे फेडावे, कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करावा? या विवंचनेत त्यांनी १४ जानेवारीला शेतात विषारी औषध प्राशन केले. त्यांना तातडीने बुलढाणा येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. आठ दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. २१ जानेवारीला त्यांची प्राणज्योत मालवली.
भारतीय स्टेट बँक व को-ऑपरेटिव्ह बँक तसेच पान्हेरा ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे ४ ते ५ लाखांचे कर्ज त्यांच्यावर होते. त्यामुळेच त्यांनी जीवनयात्रा संपविल्याचे नातेवाइकांनी सांगितले. घरातील कर्ता पुरुष गेल्याने राहणे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे..