

सोयाबीनला भाव नाही, हाताला काम नाही! कर्ज कसे फेडायचे? अंचरवाडीच्या शेतकरी पुत्राने टोकाचा निर्णय घेतला! गावात हळहळ....
Sep 8, 2024, 10:36 IST
अंचरवाडी(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कर्जबाजारीपणा आणि बेरोजगारी पणाला कंटाळून अंचरवाडी येथील शेतकरी पुत्राने विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवली. काल,८ सप्टेंबरला ही घटना घडली. संजय उर्फ राहुल दत्तात्रय परिहार (२८, रा. अंचरवाडी, ता.चिखली, जि.बुलडाणा) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
बुधवारी रात्री उशिरा संजयने विषारी औषध प्राशन केले. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्याला तातडीने उपचारासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. मात्र ८ सप्टेंबर रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संजयच्या वडिलांकडे २ एकर शेती आहे. सततची नापिकी, सोयाबीनला कमी भाव, बेरोजगारी यामुळे तो चिंतेत होता. संजयच्या वडीलांच्या नावावर बँक ऑफ महाराष्ट्रचे ३५ हजार, पैसा लेलो फायनान्स चे ४० हजार , ग्रामीण कुटाचे देखील कर्ज आहे.संजय कुटुंबातील कर्ता मुलगा असल्याने कर्ज कसे फेडायचे याच विवंचनेत तो होता. हफ्त्यावाले परेशान करत असल्याचे त्याने मित्रांना सांगितले होते. सोयाबीन निघाल्यावर कर्ज फेडू असे त्याला वाटत होते. मात्र सोयाबीनला भाव नसल्याने कर्ज फेडता येईल की नाही? असा विचारही तो करत होता. या विवंचनेत असतांनाच त्याने विषारी औषध प्राशन केले. मितभाषी आणि कष्टाळू असलेल्या राहुलच्या निधनाने अंचरवाडी गावावर शोककळा पसरली आहे.