मोताळ्याच्या कॉटन मार्केट परिसरातून साडेनऊ किलो गांजा जप्त! राहत्या घरात ठेवला होता एवढा मोठा गांजा...
Apr 6, 2026, 09:49 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शहरातील कॉटन मार्केट परिसरात अवैधरीत्या गांजा साठवून विक्री करणाऱ्या एका इसमाला मोताळा पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून तब्बल ९ किलो ८०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली असून जप्त मालाची किंमत सुमारे १ लाख ९६ हजार रुपये इतकी आहे.
अजय रोहीदास मोहिते (रा. कॉटन मार्केट परिसर, मोताळा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मोताळा पोलिसांना आरोपी आपल्या राहत्या घरी गांजा साठवून ठेवत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नियोजनबद्ध कारवाई करत आरोपीच्या घरावर छापा टाकला.
जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लु, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कपले यांच्यासह पोलीस कर्मचारी नंदकिशोर धांडे, अमोल खराडे, सुपडसिंग चव्हाण, श्रीकांत चिटवार, विजय सुरळकर, चालक मनोहर पंडीत, अनिता मोरे, प्रमोद साळोक, रविंद्र नरोटे आणि आकांक्षा जऱ्हाड यांचा समावेश होता.
पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत घराची झडती घेतली असता ९ किलो ८०० ग्रॅम गांजा आढळून आला. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याची किंमत १ लाख ९६ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कपले यांच्या फिर्यादीवरून अजय मोहिते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लु करीत आहेत.