काकूवर हल्ला करणाऱ्या पुतण्याला दोन वर्षांची शिक्षा; १० हजारांचा दंड; चिखली प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा निकाल; सावरगाव डुकरे येथील घटना...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतात पिके पाहण्यासाठी गेलेल्या काकूला पुतण्याने लाकडी काठीने मारहाण केली हाेती. या प्रकरणी आराेपीला दाेषी ठरवून चिखली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दाेन शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठाेठावला आहे. दंड न भरल्यास आराेपीस  आणखी तीन महिने कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. गणेश फकोरा सिंपने.रा. शिरपुर ह.मु सोनेवाडी, ता.चिखली असे आराेपी पुतण्याचे नाव आहे. 
फिर्यादी रुख्मिणा देवलाल सिंपने (वय ५५, रा. सावरगाव डुकरे, ता. चिखली)या १२ सप्टेंबर २०२३ रोजीआपल्या शेतातील पिके पाहण्यासाठी गेल्या असता, त्यांचा पुतण्या गणेश सिंपने याने वाद घालून लाकडी काठीने मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादींचा हात फ्रॅक्चर झाला. यावेळी आरोपीने “पुन्हा शेतात आलीस तर खून करीन” अशी धमकी देखील दिली होती.


घटनेनंतर रायपूर पोलीस ठाण्यात भादंवी कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. पुढील तपासादरम्यान पीडितेच्या वैद्यकीय अहवालावरून कलम ३२६ (गंभीर दुखापत) ची भर घालण्यात आली. मात्र, आरोपी दीर्घकाळ फरार राहिला. तब्बल सव्वा वर्षांनंतर तो सोनेवाडी येथे आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली. प्रकरणात सरकारी वकील शेख बशीर, तपास अधिकारी सहाय्यक फौजदार राजेश गवई, पोहेका शेख राजिक, नापोका आशिष काकडे तसेच कोर्ट मोहरर पोहेका दिलीप पडघान व वारंट अमंलदार संजय शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले. अखेरीस चिखली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपी गणेश सिंपने याला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.