चोरीच्या संशयावरून नेपाळी मजुराचा गावकऱ्यांच्या मारहाणीत मृत्यू; सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल!
Oct 8, 2025, 10:08 IST
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील
झोडगा येथे चोरीच्या संशयावरून गावकऱ्यांनी एका नेपाळी मजुराला पकडून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली . या मारहाणीत संबंधित मजुराचा मृत्यू झाला असून, या प्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ७ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झोडगा गावातील काही नागरिकांनी एका व्यक्तीवर चोरीचा संशय घेत त्याला पकडले व त्यास जोरदार मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलिसांचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, गावकऱ्यांनी त्या व्यक्तीस पोलिसांच्या ताब्यात दिले.
सदर व्यक्तीच्या हात, पाय, पोट आणि डोक्यावर गंभीर जखमा झालेल्या असल्याने पोलिसांनी त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
मृत व्यक्तीची ओळख बुद्धीराम लामण चौधरी (वय ५०, रा. नैनीवाल, जि. डांग, नेपाळ) अशी पटली आहे.
या घटनेबाबत मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल मतीन हारूण बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम १०३(२) बीएनएस अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी पांडुरंग दिनकर भोळे (४२), मिलिंद मधुकर भोळे, गोपाल सुधाकर नारखेडे, सतीश बालकृष्ण फिरके, गौरव सरोदे, शंकर भारंबे आणि दत्तात्रय गजानन खडसे (सर्व रा. झोडगा) या सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.