वीज वितरण कंपनीचा निष्काळजीपणा! लाकडावर थेट वायर जोडून दिला विद्युत प्रवाह शेतकऱ्यांच्या जिवाशी सुरू खेळ; कऱ्हाळवाडी शिवारातील प्रकार...
Nov 21, 2025, 16:12 IST
डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : डोणगाव परिसरात वीज वितरण कंपनीच्या निष्काळजी कारभारामुळे शेतकऱ्यांच्या जिवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. कऱ्हाळवाडी शिवारातील एका रोहित्रावर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी योग्य फ्युज न बसविता थेट लाकडावरून विद्युत प्रवाह घेऊन डायरेक्ट कनेक्शन जोडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
सदर फ्युज डब्बा हा लोखंडी असल्याने एखाद्या शेतकऱ्याला किंवा जनावराला वीजेचा धक्का बसण्याची पूर्ण शक्यता आहे. अशा प्रकारची बेफिकीरी कोणत्याही क्षणी मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देऊ शकते, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या धोकादायक पद्धतीने काम करणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करून संबंधित रोहित्रावर त्वरित फ्युज बसवावा, अशी मागणी शेतकरी गोपाल पोधाडे यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधवांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ही बाब तातडीने दुरुस्त करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
