नांदुरा अर्बन बँकेच्या एटीएममध्ये छेडछाड; २० हजार रुपये काढणारे दोघे जेरबंद; बँक शिपायाच्या सतर्कतेमुळे मोठा गैरप्रकार उघड; बनावट आधार, अनेक एटीएम कार्ड जप्त...

 
 नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : नांदुरा अर्बन बँकेच्या एटीएम मशीनशी छेडछाड करून बेकायदेशीररित्या पैसे काढणाऱ्या दोघा परप्रांतीय तरुणांना बँकेच्या शिपायाच्या सतर्कतेमुळे रंगेहात पकडण्यात आले. हा प्रकार सोमवार, १२ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे पावणे सहाच्या सुमारास घडला असून, यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दोन अनोळखी तरुण नांदुरा अर्बन बँकेच्या एटीएममध्ये दाखल झाले. त्यांनी एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून दहा-दहा हजार रुपये असे लागोपाठ दोन वेळा एकूण २० हजार रुपये काढले.
शिपायाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला प्रकार
एटीएमच्या बाहेर ड्युटीवर असलेले बँकेचे शिपाई नेमाडे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ ही माहिती बँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्रप्रसाद पांडे यांना दिली. पांडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही तरुणांची चौकशी केली. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय बळावला.
पोलिसांकडून चौकशी; बनावट कागदपत्रे आढळली
यानंतर सरव्यवस्थापक पांडे यांनी नांदुरा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोघांनाही ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्यांच्या जवळून मोठ्या प्रमाणात एटीएम कार्ड आढळून आली. तसेच त्यांच्याकडे असलेली आधारकार्डे बनावट असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
बँकेचे शाखा व्यवस्थापक राधेश्याम खंडेलवाल यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांकडून या दोघा परप्रांतीय भामट्यांची कसून चौकशी सुरू आहे. यामागे एखादी मोठी टोळी कार्यरत आहे का, याचाही तपास पोलीस करीत आहेत.