"पत्नीचा खून होणार आहे" पोलिस स्टेशनचा फोन वाजला...पोलिस लगेच पोहोचले अन् धक्काच बसला...खामगाव तालुक्यातील थरार..!

 
 खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वेळ रात्री साडेआठ वाजेची..आपत्कालीन नंबर ११२ वर फोन वाजला..पत्नीचा खून होणार आहे, तातडीने पोहोचा असे समोरचा माणूस सांगत होता..त्याच्या बोलण्यातून त्याची कळकळ जाणवत होती.. मग काय लगेच पोलिसांची यंत्रणा 
अलर्ट झाली..त्याने सांगितलेल्या पत्त्यावर पोलिस पोहोचले.. अन् तिथे गेल्यावर मात्र पोलिसांना डोक्यावर हात मारून घ्यायची वेळ आली...
   होय..ही घटना आहे खामगाव तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दधम गावची.. दधम येथील गोपाल राठोड याने आपत्कालीन ११२ वर फोन केला.. पत्नीचा खून होणार आहे, तुम्ही तातडीने पोहचा अशी विनंती त्याने पोलिसांना केली.. त्याने घटनास्थळही सांगितले..पोलिसांनी लगेच ॲक्शन मोडवर येत काही मिनिटात घटनास्थळ गाठले..मात्र तिथे पोहोचल्यावर पोलिसांना डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली..ज्याने फोन केला तो गोपाल दारूच्या तर्र नशेत होता..घरच्यांना घाबरवण्यासाठी त्याने हा खोटा कॉल केल्याचे निष्पन्न झाले..त्याच्या खोट्या कॉलमुळे पोलिसांची धांदल उडाली..त्यामुळे पोलिसही त्याला कशाला सोडतील? पोलिसांनी गोपालवर पोलिसांची दिशाभूल केल्याचा गुन्हा दाखल केला..