किनगाव राजात तरुणाच्या हत्येने खळबळ; जुन्या वादातून काटा काढण्यासाठी १.५० लाखांची सुपारी, दारूत विष मिसळून केली हत्या! बुलढाणा पोलिसांनी अवघ्या ५ तासांत ४ मारेकऱ्यांना ठोकल्या बेड्या!

मृतक तरुण चिखलीजवळच्या साकेगावचा; आरोपी उतरादा येथील..
 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  तालुक्यातील किंगाव राजा परिसरात तरुणाचा खून करून मृतदेह शेतात टाकल्याच्या घटनेचा पोलिसांनी अवघ्या पाच तासांत छडा लावला आहे. अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून हत्येचा तपास सुरू केल्यानंतर पोलिसांनी चार आरोपींना जेरबंद केले. जुन्या वादातून हा खून करण्यात आल्याचे तपासात समोर आले असून, मुख्य आरोपीने तरुणाची हत्या करण्यासाठी तब्बल १ लाख ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी फिर्यादी रमेश सांबडिंग परिहार, वय ६५ वर्षे, रा. साकेगाव, ता. चिखली यांनी किनगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांचा मुलगा उमेश रमेश परिहार (वय ३८) हा स्वतःच्या मुलाला भेटण्यासाठी ग्राम मढाखेड येथे गेला होता.

११ सप्टेंबर रोजी फिर्यादींना माहिती मिळाली की, त्यांचा मुलगा उमेश परिहार हा किनगाव राजा येथील शिवारात मृतावस्थेत आढळून आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, ग्राम तळेगाव शिवारात रोडच्या बाजूला असलेल्या सोयाबीनच्या शेतात उमेशचा मृतदेह आढळला. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापतीच्या खुणा होत्या. तोंडातून व नाकातून रक्त निघालेले होते तसेच डोक्याला मुक्का मार लागल्याचे दिसून आले.मृतदेह पाहिल्यानंतर उमेश परिहार याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार गुन्ह्याचा समांतर तपास सुरू करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा आणि किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या पथकांनी स्वतंत्रपणे तपासाची चक्रे फिरवली.

तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या खबऱ्यांच्या माध्यमातून आरोपींचा माग काढण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या पाच तासांत मृताची ओळख पटवून चार मारेकऱ्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.या प्रकरणात गणेश मोतीसिंग राजपूत (वय ३९, रा. उतरादा, ता. चिखली), गणेश पुंजाजी काळे (वय ४२, रा. सारसवती ता. लोणार), नजीम खाँ उमर खाँ पठाण (वय ५०, रा. इसोली ता. चिखली) आणि सागर प्रकाश पवार (वय ५०, रा. उतरादा, ता. चिखली) या चौघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, मृतक उमेश परिहार आणि गणेश राजपूत यांच्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून वाद होता. या वादातून त्यांच्यात अनेकवेळा भांडणे झाली होती. त्यातून उमेशचा कायमचा काटा काढण्याचे आरोपी गणेश राजपूत याने ठरवले. त्यासाठी त्याने आरोपी सागर पवार याच्या माध्यमातून आरोपी नजीम खाँ पठाण आणि गणेश काळे यांना उमेशची हत्या करण्यासाठी १ लाख ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात समोर आले आहे.९ सप्टेंबर रोजी गणेश राजपूत आणि गणेश काळे यांनी उमेश परिहार याला सोबत घेतले. रस्त्यात साखरखेडा येथून सागर पवार आणि नजीम खाँ पठाण यांनाही सोबत घेण्यात आले. त्यानंतर आरोपी आणि उमेश यांनी जेवण केले. जेवणानंतर उमेश याला दारू पाजण्यात आली.

यानंतर गणेश काळे याने उमेशला सोबत घेऊन त्याच्या दारूच्या बाटलीत विष टाकले. विष प्राशन केल्यानंतर त्याला जिवे मारून मृतदेह तळेगाव तालुक्यातील सिंदखेड राजा परिसरातील धनश्याम कुटे यांच्या सोयाबीनच्या शेतात टाकण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर, किंगाव राजा पोलीस ठाणे करीत आहेत. पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसर आणि ठाणेदार राजा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व किंगाव राजा पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.