

नांदुऱ्यात मर्डर! पुतण्याने काकाच्या छातीत हाणली कुऱ्हाड...! शेतीच्या वादातून गेला बळी...
Mar 29, 2025, 20:19 IST
नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नांदुरा तालुक्यातील सोनज (इसबपुरा) येथे आज धक्कादायक घटना समोर आली. शेतीच्या शिल्लक वादातून पुतण्याने काकाचा जीव घेतला. याप्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गोपाल बोके (५०) असे मृतकाचे नाव आहे..
प्राप्त माहितीनुसार शुभम विठ्ठल बोके (३०) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपीच्या चुलत भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार मृतक विठ्ठल बोके यांचा दुधाचा व शेतीचा व्यवसाय आहे. आरोपी शुभम कडे ट्रॅक्टर आहे. आरोपी शुभम दारू पिण्याच्या सवयीचा आहे त्यामुळे तो नेहमी काका विठ्ठल बोके व त्यांच्या कुटुंबीयांशी वाद घालायचा. काल,२८ मार्चला देखील सायंकाळी दोघांमध्ये वाद झाला त्याची तक्रार देखील कालच पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. दरम्यान आज २९ मार्च च्या सकाळी आरोपी शुभम बोके हा विठ्ठल बोके यांच्या घरासमोर आला व शिवीगाळ करू लागला.
"शेतात खत टाकायला माझे ट्रॅक्टर का सांगितले नाही, तू जास्त श्रीमंत झाला का..तुला आज खल्लासच करतो" असे म्हणत आरोपी शुभमने काका गोपाल बोके यांच्या छातीवर कुऱ्हाडीचे वार केले. या हल्ल्यात ते जागेवरच कोसळले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी गोपाल बोके यांना मृत घोषित केले. घटनेनंतर शुभम हा घटनास्थळावरून पसार झाला..