महावितरणची चोरीची तार नांदुरात जप्त; ४.२५ लाखांचा मुद्देमाल, एक अटकेत, दुसरा फरार

 
 नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :
नांदुरा पोलिसांनी खामगाव रस्त्यावरील एका गोदामावर छापा टाकून सुमारे ४ लाख २५ हजार रुपये किमतीची महावितरणची चोरीची विद्युत तार जप्त केली असून, या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे, तर दुसरा आरोपी फरार आहे.
नांदुरा पोलिसांना शे. मुख्तार शे. निसार यांच्या गोदामात महावितरणची चोरीची विद्युत तार लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पंचासह आणि महावितरणचे अभियंता जयस्वाल यांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला. गोदामातून १,६०५ किलो अॅल्युमिनियमची विद्युत तार आढळून आली. या तारांची अंदाजे किंमत ४ लाख २५ हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
तपासादरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सदर तार निमगाव व अलमपूर शिवारातून चोरीला गेल्याची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणात शे. मुख्तार याला ताब्यात घेतले असून, त्याचा मुलगा शे. सोहेल फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मिलिंद जवनजाल, बीट अंमलदार भीमराव वानखेडे, लेखक कैलास सुरडकर आणि गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. पुढील तपास नांदुरा पोलीस करत आहेत.