महावितरणचा वीज चोरट्यांना शॉक; बुलढाणा जिल्ह्यात दोन कोटी ९६ लाखांची चोरी पकडली; तब्बल ७५१ वीज चोरी उघडकीस; आठ महिन्यात अकोला परिमंडळात १ हजार ५२० वीज चोरीच्या घटना !

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अकोला परिमंडळात गेल्या आठ महिन्यात वीज चोरीविरोधात महावितरणकडून राबविण्यात आलेल्या व्यापक मोहिमेत १५२० वीज चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणांतून एकूण ७ कोटी ८३ लाख रुपयांची आकारणी करण्यात आली असून ७ कोटी ७ लाख रुपये वसूल करण्यात महावितरणला यश आले आहे. वीज चोरी विरोधात मोहिम अधिक तीव्र करण्याचे निर्देश मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी दिले आहे.बुलढाणा जिल्ह्यात आठ महिन्यात वीज चोरीच्या ७५१ घटना उघडकीस आल्या आहेत. तब्बल दोन कोटी ९६ लाखांची चोरी पकडण्यात महावितरणला यश आले आहे. 
थेट वीज वाहिनीवर हुक टाकून वीज जोडण्या, मीटरमध्ये छेडछाड करून अनधिकृत वीज वापर करणाऱ्यांवर अकोला परिमंडळाअंतर्गत अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात  व्यापक मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमुळे वीज चोरांचे धाबे दणाणले असून, वितरण व्यवस्थेतील नुकसान कमी होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे भविष्यातही वीज चोरीविरोधात कठोर कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे महावितरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 एप्रिल २०२५ पासून म्हणजे गेल्या आठ महिन्यात उघड करण्यात आलेल्या वीज चोरीच्या प्रकरणामध्ये १५२० ग्राहकांनी थेट वीज चोरी किंवा मीटरशी छेडछाड केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. विद्युत कायदा २००३ कलम १३५ अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत वीजबिलासह दंडात्मर कारवाईपोटी ७ कोटी ८३ लाख रूपये आकारण्यात आले असून १३२४ प्रकरणात ७ कोटी ७ लाख रूपयाची वसूली करण्यात आली असून वीजबिलासह तजजोड शुल्क न भरल्याने १० प्रकरणात वीज चोरीसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हानिहाय उघड झालेली वीज चोरी
 महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत येत असलेल्या अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यापैकी सर्वात जास्त म्हणजे २ कोटी ९६ लाखाच्या ७५१ वीज चोऱ्या बुलडाणा जिल्ह्यात उघड झाल्या आहेत. त्यानंतर अकोला जिल्ह्यात २ कोटी ५८ लाख रूपयाची ४९९ वीज चोरीची प्रकरणे असून वाशीम जिल्ह्यात २७० प्रकरणात २ कोटी २९ लाख रूपयाची वीज चोरी झाल्याचे उघड झाले आहे.
 
अशी होते दंडात्मक कारवाई :-
 वीज मीटर मध्ये फेरफार अथवा छेडखानी करणे हा विद्युत विद्युत २००३ नुसार गुन्हा असून या अंतर्गत संबंधित वीज ग्राहकावर कलम १३५ अन्व्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो. तसेच या ग्राहकांना मीटर रीडिंगच्या दुप्पट रक्कम आकारण्यात येते. त्याचबरोबर प्रति केडब्ल्यू/एचपी नुसार औद्योगिक ग्राहकावर १० हजार रुपये,वाणिज्यिक ग्राहकावर ५ हजार रुपये,कृषी ग्राहकावर १ हजार रुपये तर इतर वर्गवारीतील ग्राहकावर २ हजार रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येते. 

विद्युत कायद्यात शिक्षेची तरतूद :-
       तसेच गुन्हा सिद्ध झाल्यास ३ वर्षा पर्यंतच्या शिक्षेची तरतूद वीज कायद्यात आहे. वीज मीटर मध्ये फेरफार करण्यासाठी प्रवृत्त व सहकार्य करणाऱ्या विरुद्ध विद्युत कायद्यातील कलम १५० नुसार गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे.

कारवाईदरम्यान अडथळा आणू नये: 
 वीज चोरीमुळे होणाऱ्या अतिरिक्त वीज वापराचा परिणाम होऊन महावितरणची यंत्रणा अतिभारीत होवून सुरळीत वीज पुरवठ्याला अडथळा निर्माण होतो.याशिवाय महावितरणला करोडो रूपयाचे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे महावितरणने एक्शन मोडवर कारवाई सुरू केली असून,या कारवाईदरम्यान अडथळा न आणता सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.