वळण घेणाऱ्या दुचाकीस भरधाव कंटेनरची जोरदार धडक; शेतकरी जागीच ठार नांदुरा मार्गावरील बेलाड फाट्यावरील घटना...
Oct 14, 2025, 12:37 IST
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पेट्रोल भरण्यासाठी वळण घेऊन जात असलेल्या दुचाकीला भरधाव कंटेनरने धडक दिल्याने शेतकरी जागीच ठार झाला.ही घटना नांदुरा मार्गावरील बेलाड फाट्यावर १३ ऑक्टोबर रोजी घडली.शरद दशरथ नारखेडे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद नारखेडे हे एमएच-२८-वाई-५१५४ क्रमांकाच्या दुचाकीवरून पत्नीसह नांदुरा तालुक्यातील डिघी येथे मामाकडे जात होते. मार्गात त्यांनी बेलाड फाट्याजवळ पत्नीला रस्त्याच्या कडेला उतरवून पेट्रोल पंपाकडे वळण घेतले, त्याच क्षणी एचआर-३८-एजी-४७३९ क्रमांकाच्या भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात कंटेनरचे चाक नारखेडे यांच्या डोक्यावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, शहर पोलिस स्टेशनचे पीएसआय प्रशांत श्रींगारे, प्रवीण धांदरे व सचिन पवार यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून कंटेनर ताब्यात घेतला. मात्र, चालक अपघातानंतर फरार झाला आहे.
मृत शरद नारखेडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व आई-वडील असा परिवार आहे. या घटनेमुळे झोडगा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.