बुलढाण्यातील मोटारसायकल चोरीचा छडा! २५ वर्षांचा चोरटा पकडला; हॅण्डल लॉक नसलेल्या गाड्यांना करायचा टार्गेट; शॉकअप, टायर वेगवेगळे करायचा....

 
 बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा शहरात मोटारसायकल चोरी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी एकाला अटक करून तब्बल १ लाख ८५ हजार रुपये किंमतीच्या सात मोटारसायकली जप्त केल्या आहेत. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस स्टेशन बुलढाणा शहराच्या पथकाने केली असून पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल २०२५ रोजी दाखल झालेल्या मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे पोलिसांनी तेजस संजय पोकळे (वय २५, रा. रोहिनखेड, ता. मोताळा) याला अवघ्या २४ तासांत अटक केली.

Gode

Advt 
आरोपीकडून चोरीस गेलेल्या सात मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून त्याची एकूण किंमत अंदाजे १ लाख ८५ हजार रुपये आहे. यापैकी काही मोटारसायकली बुलढाणा शहर आणि परिसरातून चोरी केल्याची आरोपीने कबुली दिली आहे. आरोपीकडून आणखी गुन्ह्यांचा तपास सुरू असून इतर वाहनचोरी प्रकरणे उकलण्याची शक्यता आहे.
चोरीची पद्धत: 
आरोपी हा आठवडी बाजार, गॅरेज गल्ली यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी हँडल लॉक नसलेल्या मोटारसायकली ओळखून त्यांची चोरी करीत असे. नंतर त्या निर्जन स्थळी नेऊन टायर, शॉकअप यासारखे भाग वेगळे करत असे.
ही कामगिरी पोलिस निरीक्षक रवि राठोड, सपोनि प्रताप भोस, पोउपनि अश्विनी गाडे, पोहेकॉ प्रकाश बाजड, विनोद बोरे,पोकॉ मनोज सोनुने आदींच्या पथकाने केली आहे.पोलीस विभागाच्या सतर्कतेमुळे वाहनचोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.