भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार, एक गंभीर साखरखेर्डा ते लव्हाळा रस्त्यावरील घटना; मृतक देऊळगाव माळी येथील...

 
 साखरखेर्डा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : भरधाव दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एक युवक ठार तर एक युवक गंभीर जखमी झाला. ही घटना लव्हाळा ते साखरखेर्डा रोडवर मोहाडी फाट्या जवळ 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताचे सुमारास घडली . गणेश विश्वनाथ मते (वय 28,रा. देऊळगाव माळी) असे मृतकाचे नाव आहे.

देऊळगाव माळी येथील गणेश विश्वनाथ मते  हा युवक आपल्या पलसर क्र एमएच १८ सीडी ६११६ दुचाकीने लव्हाळा कडून साखरखेर्डा येथे जात होता. तसेच सवडद येथील कारपेंटर अनिल कचरू खोलगाडगे वय ३० हा साखरखेर्डा येथून आपली दुचाकी एच एफ डिलक्सने क्र एममहा ३७ - ९८४७ ने सवडद आपल्या गावी जात होता . 

मोहाडी फाट्यानजीक उतारात दोन्ही मोटारसायकलची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही युवक गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने काही नागरिकांनी साखरखेर्डा  प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले . साखरखेर्डा येथे प्राथमिक उपचार करून तातडीने   चिखली येथील खासगी रुग्णालयात हलवले असता यापैकी गणेश याला डॉक्टरांनी मृत घोषित केले . 

तर अनिल खोलगाडगे त्याचेवर उपचार सुरू आहेत . गणेश मते हा मेहकर येथे गाभणे हॉस्पिटलमधे कम्पाउंडर म्हणून नोकरीला होता . दिवसभर देऊळगाव माळी येथे पानठेला चालवून तो रात्री मेहेकर येथे नोकरी करत होता . दरम्यान ठाणेदार गजानन करेवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही दुचाकीचा पंचनामा करून वाहने ताब्यात घेतली आहे .