भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक; महिला जागीच ठार, युवक गंभीर; राष्ट्रीय महामार्गावरील हाॅटेल सुर्याजवळ टर्निंग पाॅइंटवरील घटना...

 
 मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने महिला जागीच ठार तर युवक गंभीर जखमी झाला. ही घटना 
राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल सुर्यानजीक टर्निंग पॉईंटवर ३१ ऑक्टाेबर राेजी घडली. विमल भास्करराव गायकवाड (वय ६५,रा.वडाेदा) असे मृतक महिलेचे नाव आहे. तसेच नरेश भास्करराव गायकवाड हे या अपघातात गंभीर जखमी झाले. 


वडाेदा येथील नरेश भास्करराव गायकवाड  व विमल भास्करराव गायकवाड हे आपल्या दुचाकी क्रमांक एमएच २८ एटी १९१६ या वाहनाने मलकापूर येथील दवाखान्याचे काम आटोपून घरी परतत होते. त्यावेळी मागून येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक एवढी गंभीर होती की दुचाकीवरील विमल गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला.

तर त्यांचा मुलगा नरेश गायकवाड हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच शहरातील राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत एकच गर्दी केली होती. तर शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन नरेश गायकवाड याला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालया मलकापूर येथे दाखल करण्यात आले.