मायलेकांचा दुर्दैवी अंत : तुरीच्या आगीत चिमुकला गेला, धक्क्याने आईचाही मृत्यू; हरणखेड येथील घटना

 
 मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :  एका क्षणात आनंदी घरावर काळाने झडप घातली आणि मायलेकांचे नाते कायमचे तुटले. बैलगाडीवरील तुरीच्या गंजीला लागलेल्या भीषण आगीत सात वर्षीय ओमचा होरपळून मृत्यू झाला; आणि पोटच्या लेकराच्या मृत्यूची बातमी समजताच आजारपणाने खंगलेल्या आईनेही धक्क्याने प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना २२ फेब्रुवारी रोजी हरणखेड येथे घडली.

शेतकरी संदीप होले सकाळी शेतात गेले होते. दुपारी ओम वडिलांना घरी बोलावण्यासाठी शेतात आला. त्या वेळी तुरीच्या पेंढ्या गोळा करून बैलगाडीवर रचण्यात आल्या होत्या. ओम त्या गंजीवर बसला होता. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास आजूबाजूचा कचरा जाळला जात असताना अचानक जोराचा वारा सुटला. पेटलेल्या कचऱ्यातील ठिणगी तुरीच्या पेंढ्यांवर पडताच आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले.

संदीप होले यांनी आरडाओरडा केला; परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. गंभीर भाजलेल्या ओमला तत्काळ उपचारासाठी मलकापूर येथे नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढे जळगाव येथे हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

ही बातमी समजताच अंथरुणाला खिळून असलेल्या आई वनिता होले (३२) यांना असह्य धक्का बसला आणि त्यांनीही अखेरचा श्वास घेतला. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी व दुपारी मायलेकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

या दुर्दैवी घटनेने हरणखेडसह पंचक्रोशी सुन्न झाली असून, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि मनात एकच प्रश्न आहे—नशिबाचा हा क्रूर खेळ का?