‘माता न तू वैरिणी!’ ती निर्दयी माता-पिता कोण? अवघ्या दोन दिवसांच्या नवजात चिमुकलीचा मृतदेह वायरच्या थैलीत आढळला!
बुलढाणा शहरातील धाड नाका तलावाच्या काठावर मन सुन्न करणारी घटना; चिमुकलीला कुणी अन् का टाकले? पोलीस तपास सुरू...
प्राप्त माहितीनुसार, आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास धाड नाका परिसरातील तलावाच्या काठावर फिरण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांच्या निदर्शनास एक बेवारस थैली पडलेली दिसली. या थैलीत नवजात बालिकेचा मृतदेह असल्याचे समोर येताच एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती तातडीने बुलढाणा शहर पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, तपासासाठी फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले आहे. घटनास्थळावरून महत्त्वाचे धागेदोरे मिळतात का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
चिमुकलीचा काय दोष? जन्मदात्यांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान!
प्राथमिक अंदाजानुसार मृत बालिका अवघ्या दोन दिवसांची असावी. मात्र, तिची ओळख अद्याप समोर आलेली नाही. या चिमुकलीला जन्म कुठे देण्यात आला? तिच्या आई-वडिलांनीच तिला येथे टाकले की अन्य कुणाचा या प्रकारात सहभाग आहे? याचा उलगडा होणे आवश्यक आहे. बालिकेच्या मृत्यूचे नेमके कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. एकीकडे मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी समाजात जनजागृती केली जात असताना दुसरीकडे अवघ्या दोन दिवसांच्या नवजात बालिकेचा मृतदेह अशा अवस्थेत सापडल्याने अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न निर्माण झाले आहेत.जगात येऊन अवघे दोन दिवस झालेल्या त्या निष्पाप जीवाची ओळखही अद्याप पटलेली नाही. तिचा मृत्यू कसा झाला आणि मृतदेह तलावाच्या काठावर कुणी आणून टाकला, याचे उत्तर आता पोलीस तपासातूनच समोर येणार आहे. या घटनेचे गूढ उकलण्याचे मोठे आव्हान बुलढाणा शहर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.