समृद्धी महामार्गावर पहाटेचा थरार! ट्रकने अचानक बदलली लेन; ट्रॅव्हल्स, कार अन् ट्रकचा तिहेरी भीषण अपघात.....

 
 दुसरबीड (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरमध्ये रविवारी (२६ जुलै) पहाटे झालेल्या तिहेरी अपघाताने काही काळ एकच खळबळ उडाली. भरधाव वेगाने धावणाऱ्या अज्ञात ट्रक चालकाने अचानक लेन बदलल्याने ट्रॅव्हल्सची ट्रकला जोरदार धडक बसली. त्यानंतर मागून येणाऱ्या कारनेही ट्रॅव्हल्सला धडक दिल्याने तीन वाहनांचा भीषण साखळी अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून अन्य चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.

ठाकरे

ADVT 

 

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे सुमारे ३.५५ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील नियंत्रण कक्षाकडून समृद्धी महामार्गावरील चॅनेज क्रमांक ३३६.२०० (नागपूर कॉरिडॉर) येथे अपघात झाल्याची माहिती समृद्धी महामार्ग उपकेंद्र, सिंदखेडराजा येथे मिळाली. त्यानंतर पोलिस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.प्राथमिक माहितीनुसार, मुंबईहून नागपूरकडे जाणारी ट्रॅव्हल्स (एमएच १४ एलएक्स १३२०) अज्ञात ट्रकच्या मागून जात असताना ट्रक चालकाने अचानक लेन बदलली. त्यामुळे ट्रॅव्हल्सची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली. या धडकेनंतर मागून भरधाव येणारी कार (एमएच ४३ सीयू ११६१) ट्रॅव्हल्सवर आदळली आणि क्षणार्धात तिहेरी अपघात घडला.

या अपघातात ट्रॅव्हल्समधील विनोद नागोश (वय ४७), खलील खान (वय ५५), तसेच कारमधील प्रणव मिश्रा (वय ४४) आणि मोहित मिश्रा हे किरकोळ जखमी झाले. तर मनीष पांडे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग उपकेंद्राचे एच.सी. गायकवाड, पीसी २६११, एमएसएफचे दोन जवान, १०८ रुग्णवाहिकेचे चालक दिगांबर शिंदे व सुशील मरमट यांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉ. वैभव बोराडे आणि डॉ. यासीन शहा यांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सिंदखेडराजा येथील रुग्णालयात हलविले.

अपघातानंतर ट्रॅव्हल्स आणि कार ही दोन्ही वाहने १२० किमी प्रतितास वेगाच्या लेनमध्ये अडकल्याने काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. मात्र, क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ बॅरिकेडिंग करून वाहतूक सुरक्षितपणे सुरू ठेवली आणि अल्पावधीतच महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अज्ञात ट्रक चालकाचा शोध सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास सिंदखेडराजा पोलीस करीत आहेत.