चिखलीत एटीएम फोडून १० लाखांहून अधिक रोकड लंपास; पोलिसांचा तपास सुरू; चोरीच्या घटनेने शहरात खळबळ
Updated: Sep 22, 2025, 11:25 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :शहरातील राऊतवाडी परिसरात शनिवारी पहाटे दोन ते तीन वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) चे एटीएम गॅस कटरने फोडून तब्बल १० लाख ८५ हजार ५०० रुपये लंपास केले. ही धाडसी चोरी उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर रंगाचा स्प्रे मारून ते निष्क्रिय केले. त्यानंतर वायरींग कापून सुरक्षा यंत्रणा निकामी केली. सर्व अडथळे दूर केल्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फिंगरप्रिंट एक्सपर्ट व डॉग स्क्वॉडच्या मदतीने पुरावे गोळा करण्यात आले आहेत.
फिर्यादी परेश राजेंद्र केचे (वय ३६), उपशाखा प्रबंधक, स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चिखली यांच्या तक्रारीवरून अज्ञात चार चोरट्यांविरोधात भादंवि व बीएनएसच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक संग्रामसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय समाधान वडने करीत आहेत.