अल्पवयीन मुलीवर दोन वेळा अत्याचार; २४ वर्षीय युवकावर पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

 

पिंपळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात केवळ १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर २४ वर्षीय युवकाने दोन वेळा अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना १४ व २३ मे २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून, पोलीसांनी संबंधित आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऋषिकेश समाधान मानकर (वय २४) याने १४ मे रोजी रात्री २ वाजता पीडित मुलीला तिच्या आई व बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत शेतामध्ये नेले आणि तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर २३ मे रोजी रात्री पुन्हा एकदा तशाच प्रकारे धमकी देत तिच्यावर दुसऱ्यांदा अत्याचार करण्यात आला.
हा संपूर्ण प्रकार पीडित मुलीने तिच्या आईला सांगितल्यानंतर त्यांनी थेट पिंपळगाव राजा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी ऋषिकेश मानकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम १३७ (२), ६४ (१), ६४ (२)(एम), ७८/३५१ (२) तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
पोलीसांनी आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता, सुरुवातीला त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपळगाव राजा पोलीस करत आहेत.