जयस्तंभ चौकात बॅनरवरून मध्यरात्री राडा! विद्याधर महालेंच्या मित्रपरिवाराला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी; विकी आव्हाडसह ७-८ जणांविरुद्ध गुन्हा

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव तथा चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवरून बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौकात मध्यरात्री मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. कटआउट लावण्यावरून वाद झाल्यानंतर शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी विकी आव्हाड याच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 विद्याधर महाले यांचा १ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त चिखलीसह बुलडाणा शहरात त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर २९ ऑगस्टच्या रात्री जयस्तंभ चौकातील गांधीभवनासमोर कटआउट लावण्याचे काम सुरू होते. मात्र, याचवेळी झालेल्या वादामुळे वातावरण चांगलेच तापले.

नेमकं काय घडलं?

प्राप्त माहितीनुसार, विद्याधर महालेंच्या मित्रपरिवारातील मंदार बाहेकर, मुन्ना बेंडवाल आणि प्रमोद गावंडे हे काही मजुरांच्या मदतीने जयस्तंभ चौकात कटआउट लावत होते. यासाठी बुलडाणा नगरपरिषदेची अधिकृत परवानगी घेण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
कटआउट लावण्याचे काम सुरू असतानाच एका पांढऱ्या कारमधून काही जण तेथे आले. त्यापैकी विकी आव्हाड याने ‘तुम्ही इथे पोस्टर कसे काय लावता?’, अशी विचारणा करत वाद घातल्याचा आरोप आहे. त्यानंतर अश्लील शिवीगाळ करण्यात आली तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकारानंतर विद्याधर महालेंच्या मित्रपरिवारातील सदस्यांनी थेट बुलडाणा शहर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी विकी आव्हाड याच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, वाढदिवसाच्या बॅनरवरून सुरू झालेला हा वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्याने बुलडाणा शहरात या घटनेची चर्चा रंगली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बुलडाणा शहर पोलीस करीत आहेत.