उल्कानगरीचे बसस्थानक बनले चोरट्यांचे ‘आगार’; महिलांच्या पर्स, , साेनसाखळी लंपास करण्याच्या घटना वाढल्या; बसस्थानकात कॅमेरे बसविण्याची मागणी..!

 
लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील बसस्थानक परिसर गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचे आगार बनला आहे. महिलांच्या पर्स, गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी लांबविणे, तर बॅगा व खिशातून मोबाईल तसेच रोकड लांबविण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, पोलीस यंत्रणा निष्क्रीय असल्याचा आरोप केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना घडली असून, त्याची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे. याआधी देखील बसस्थानकातून अनेक महिलांच्या सोनसाखळ्या चोरीला गेल्या आहेत. मोबाईल चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. मात्र, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली तरी मोबाईल परत मिळेल किंवा चोर पकडला जाईल याची शाश्वती नसल्याने अनेक प्रवासी तक्रार देणे टाळतात, असे बोलले जाते. चोरीच्या वारंवार घटना घडत असताना, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास पोलिसांना चोर ओळखण्यात व पकडण्यात मदत होईल. चोरीच्या घटनांनाही आळा बसेल. त्यामुळे लवकरात लवकर कॅमेरे बसविण्यात यावेत तसेच महामंडळाकडून सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी माजी नगरसेवक अब्दुल उबेद अब्दुल मुनाफ यांनी केली आहे.


"बसमध्ये चढताना किंवा चालत्या बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन मंगळसूत्र, मोबाईल व पाकीट चोरीच्या अनेक घटना घडतात. बसस्थानकाचे पोलीस गर्दीच्या ठिकाणी गस्त घालत असतील, तर संशयित चोरट्यांना संधीच मिळणार नाही. लग्नसराई व बाजाराच्या दिवशी बसस्थानकात प्रचंड गर्दी असते."असे शेख आसिफ शेख युसुफ यांनी सांगितले.