मेहकरच्या अंजनी बुद्रुक मध्ये सुरू होता अल्पवयीन मुलीचा विवाह सोहळा! पोलिसांनी थांबवले...

 
 डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथे अल्पवयीन मुलीचा विवाह प्रशासन आणि पोलिस विभागाच्या संयुक्त कारवाईमुळे रोखण्यात आला. या कारवाईमुळे बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाची तत्परता पुन्हा अधोरेखित झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.५० वाजता डोणगाव पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार गोविंद खंडागळे यांना डायल ११२ द्वारे गोपनीय माहिती प्राप्त झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजंठा येथील अल्पवयीन मुलीचा विवाह अंजणी बुद्रुक येथील युवकासोबत होत असल्याची माहिती त्यात देण्यात आली होती. दरम्यान, चाइल्ड हेल्पलाइन बुलढाणाचे पर्यवेक्षक सागर नरवडे यांनीही प्रशासनाला याबाबत माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने कारवाईची सूत्रे हलवली.

बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी, अंजनी बुद्रुक, योगेंद्र यांनी गुलाबराव बचाटे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह विवाहस्थळी धाड टाकली. पडताळणीनंतर संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आल्यानंतर विवाह सोहळा तात्काळ थांबविण्यात आला.

संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या संरक्षणाची आवश्यकता लक्षात घेऊन तिला नातेवाईकांसह पुढील आदेशासाठी बाल कल्याण समितीसमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यासाठी पोलिस महिला कॉन्स्टेबल शालू गिन्हे यांच्या सोबत तिला बुलढाण्याकडे रवाना करण्यात आले.

ही कारवाई डोणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमरनाथ नागरे, पोलिस कर्मचारी कुंडलिक वाळले, महिला पोलिस कॉन्स्टेबल शालू गिन्हे तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने केली.