घारोड येथे गोठ्याला भीषण आग! जनावरांचा चारा अन् शेती साहित्य जळून खाक; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

Advt 👆
मिळालेल्या माहितीनुसार, घारोड येथील वसंत सखाराम दुतोंडे यांच्या गोठ्याला मध्यरात्री अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. गोठ्यात साठवून ठेवलेला सोयाबीनचा कुटार, तुरीचे कुटार, शेती उपयोगी अवजारे आणि इतर कृषी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
घटनेची माहिती मिळताच सरपंच वैभव किशोर ठाकरे यांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आग अधिक पसरण्यापासून रोखण्यात यश आले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर सकाळी ग्राम महसूल अधिकारी एस. यू. पठाण, ग्रामपंचायत अधिकारी दीपक नेमाने, सरपंच वैभव ठाकरे यांच्यासह गावकऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. पंचनामा करून संबंधित नुकसानीचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आला आहे.
या आगीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, शासनाकडून तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.