रेतीमाफितांच्या विरोधात खडकपूर्णात मोठी कारवाई; ६ बोटी,९ ब्रास रेतीसह ८१ लाखांचा मुद्देमाल जप्त; झारखंडचा गडी ताब्यात...
May 18, 2026, 08:27 IST
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):तालुक्यातील सिनगाव जहागीर शिवारातील संत चोखामेळा धरण परिसरात सुरू असलेल्या रेतीच्या अवैध उपशावर देऊळगाव राजा पोलिसांनी महसूल विभागाच्या मदतीने मोठी धडक कारवाई करत तब्बल ८१ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध रेती तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाने रेती माफियांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ मे रोजी सकाळच्या सुमारास पोलिस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांना गुप्त माहितीदारामार्फत संत चोखामेळा धरण परिसरात बोटींच्या साहाय्याने शासनाचा महसूल बुडवून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा होताच पोलिस निरीक्षक गिरी यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.
यानंतर पोलिस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकिसन गिते, पोलिस कर्मचारी प्रवीण डोईफोडे व शिवाजी दराडे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांचे पथक धरण परिसरात पोहोचताच काही संशयितांनी पोलिसांची चाहूल लागताच दुसऱ्या बोटीच्या सहाय्याने घटनास्थळावरून पळ काढल्याचे समोर आले.
दरम्यान, घटनास्थळी सुरू असलेल्या कारवाईदरम्यान पोलिसांनी तीन मोठ्या लोखंडी बोटी, तीन इंजिनयुक्त लहान बोटी, जोडणी साहित्य तसेच ९ ब्रास रेती असा एकूण ८१ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत शेख फिटू शेख मुस्ताक (वय ३०, रा. अनामत, ता. राजमहल, जि. साहेबगंज, झारखंड) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यासह इतर फरार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत तहसीलदार सायली जाधव यांच्यासह महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. संत चोखामेळा धरण परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती उपशामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. अखेर पोलिस आणि महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईने रेती माफियांना मोठा दणका बसल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.