चिखलीत गांजाविरोधी मोठी कारवाई; ४.६० लाखांचा मुद्देमाल जप्त! इंदिरा नगर परिसरातील घरावर छापा; ९ किलो २१५ ग्रॅम गांजा हस्तगत; एलसीबीने केली धडक कारवाई...

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या “मिशन परिवर्तन” मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने चिखली शहरात मोठी कारवाई करत तब्बल ९ किलो २१५ ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत सुमारे ४ लाख ६० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात गांजा व इतर अमली पदार्थांची विक्री, वाहतूक व साठवण करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चिखली शहरातील इंदिरा नगर, गोरक्षणवाडी परिसरात एका घरामध्ये गांजा साठवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
या माहितीनुसार १६ मे रोजी पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यामध्ये घरातून अवैधरित्या साठवून ठेवलेला गांजा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ मुद्देमाल जप्त करत आरोपी सय्यद समीर सय्यद सलीम (वय ३८, रा. इंदिरा नगर, गोरक्षणवाडी, चिखली) याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई ,जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे,अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे तसेच पथकातील पोलीस कर्मचारी यांनी केली.