विवाहितेची छेडछाड करून दगडाने मारहाण; पतीलाही केली मारहाण; ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, मेरा खुर्द येथील घटना !
Dec 5, 2025, 17:56 IST
अंढेरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतातील मक्याचे कणीस व कांदे चोरून नेत असताना हटकल्याने चौघांनी एकास मारहाण केली. तसेच त्याच्या पत्नीची छेड काढून दगडाने मारहाण केल्याची घटना 4 डिसेंबर रोजी मेरा खुर्द येथे घडली. या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी चार जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मेरा खुर्द येथील सतीश मधुकर वाघमारे (वय ३४) यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, ते व त्यांची पत्नी शेतात असताना आरोपी मक्याचे कणीस व कांदे चोरून नेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावर फिर्यादीने कारण विचारले असता आरोपी संतापला व त्याला लोटापोट करून मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान फिर्यादीची पत्नी मदतीला आली असता आरोपींनी तिला पकडून छेडछाड केली, तसेच दगडाने मारहाण केली. आरोपींनी दाम्पत्याला शिवीगाळ करून दमदाटीही केली.
या प्रकरणी फिर्यादीवरून पोलिसांनी शिवशंकर श्रीराम वाघमारे, अंकुश शिवशंकर वाघमारे, रवींद्र मधुकर वाघमारे, ओम संतोष वाघमारे (सर्व रा. मेरा खुर्द) यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७६, ११८(१), ११५(२), २९६, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
