विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ; गर्भावस्थेत मारहाणीमुळे बाळाचा मृत्यू, तलाक व जीवे मारण्याच्या धमक्या, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल...

 
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील मेहबूबपुरा येथे वास्तव्यास असलेल्या एका विवाहित मुस्लिम महिलेचा शारीरिक व मानसिक छळ, हुंड्यासाठी मारहाण, बेकायदेशीर तलाक व जीवे मारण्याच्या धमक्यांचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात पतीसह सात जणांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
या प्रकरणी अंजुम जफर कुरेशी (वय २५, धंदा – गृहिणी, मूळ रा. बाराभाई गल्ली, अंबाजोगाई, जि. बीड; ह.मु. मेहबूबपुरा, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, फिर्यादी व आरोपी हे पती-पत्नी असून विवाहानंतर सासरकडील मंडळींनी घरकाम येत नाही, किरकोळ कारणांवरून शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांनंतर फिर्यादी गर्भवती असताना पती, दिर व नणंद यांनी गरोदरपणाच्या खर्चासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला.या छळ व मारहाणीमुळे फिर्यादीवर तीव्र मानसिक ताण निर्माण झाला. सातव्या महिन्यात पतीने केलेल्या मारहाणीमुळे फिर्यादीचा रक्तदाब वाढून तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे.

यानंतर फिर्यादी मावशीकडे राहत असताना आरोपी पती, दिर, सासू-सासरे व इतर नातेवाईक मावशीच्या घरी येऊन, “तुला नांदवणार नाही, इथून निघून जा, मला दुसरे लग्न करायचे आहे” असे म्हणत “तलाक, तलाक, तलाक” उच्चारून बेकायदेशीर तलाक दिल्याचे सांगितले. तसेच फिर्यादी व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. जफर मजहरमियाँ कुरेशी (पती),मजहरमियाँ मुसा कुरेशी (सासरे), शमशाद मजहरमियाँ कुरेशी (सासू), जुबेर मजहरमियाँ कुरेशी (दिर),निजाम कुरेशी (नंदई),शहाणा निजाम कुरेशी (नणंद), शाहेदा शकील सौदागर (सर्व रा. बाराभाई गल्ली, अंबाजोगाई, जि. बीड) यांच्या विरुध्द   भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 85, 74, 333, 115(2), 352, 3(5) तसेच मुस्लिम महिला (विवाह अधिकार संरक्षण) अधिनियम 2019 कलम 3 व 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 सदर गुन्हा दि. १ जानेवारी २०२६ रोजी   दाखल करण्यात आला असून, पुढील तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात  तपास हेड कॉन्स्टेबल विनोद गवई करीत आहेत.