अल्पवयीन मुलीसोबत विवाह; तिघांविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल...

 
 लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अल्पवयीन मुलीसोबत विवाह केल्याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार तिघांविरोधात लोणार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना एप्रिल महिन्यात घडली असून, बालविवाह प्रतिबंध अधिकारी यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

लोणार तालुक्यातील एका गावातील कुटुंबाने ३० एप्रिल २०२५ रोजी जाफ्राबाद येथील एका संस्थान परिसरात आपल्या मुलाचा विवाह पार पाडला होता. विवाह पार पडल्यानंतर काही संशयास्पद बाबी लक्षात आल्याने संबंधित प्रकरणाची माहिती बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली.
तपासात विवाहातील वधू ही कायद्याने निर्धारित वयापेक्षा कमी असल्याचे पुराव्यानिशी स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणात वधूचा पती, त्याचे वडील आणि मुलीचे पालक अशा तिघांविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाफ्राबाद येथील बालविवाह प्रतिबंध अधिकारी किशोरकुमार देवकर यांनी लोणार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पुढील अनुषंगिक गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.