पत्नीच्या निर्घृण हत्येप्रकरणी पतीला आजन्म कारावास; खामगाव न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
Updated: Jan 10, 2026, 15:20 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पत्नीला बांबूच्या काठ्यांनी बेदम मारहाण करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी पतीस आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. बी. जाधव यांनी नानकराव उर्फ राजाराम उर्फ गणेश दयाळू मिलावेकर (रा. सोनाळा) याला भारतीय दंड संहिता कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवत आजन्म कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास एक वर्षाचा सश्रम कारावास भोगण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Advt👆
सोनाळा येथे २०२० मध्ये नानकराव मिलावेकर याने पत्नी मिराबाई मिलावेकर हिला बांबूच्या काठ्यांनी बेदम मारहाण करून तिची हत्या केली होती. या घटनेनंतर सोनाळा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (ए.डी. क्र. २१/२०) घेत सखोल तपास केला. ओमप्रकाश खंडेलवाल यांनी १९ ऑक्टोबर २०२० रोजी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ओमप्रकाश खंडेलवाल, गौतम तायडे, अनिल तायडे व अजय शेवरे यांनी महत्त्वपूर्ण साक्ष दिली. सरकार पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. घटनास्थळ पंचनामा, वैद्यकीय अहवाल तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील पाटील यांची साक्ष, फिर्यादी हेकॉ. सुनील सुसर आणि तपास अधिकारी प्रकाश सोमनाथ पवार यांच्या साक्षी व ठोस पुराव्यांच्या आधारे सरकारी अभियोक्ता उदय सुधाकर आपटे यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
सर्व साक्षी व पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी नानकराव उर्फ राजाराम उर्फ गणेश दयाळू मिलावेकर याला दोषी ठरवून शुक्रवार, ९ जानेवारी रोजी हा निकाल सुनावला. या प्रकरणात कोर्ट पैरवी म्हणून विक्रम राठोड यांनी काम पाहिले.
या निकालामुळे पत्नीवरील कौटुंबिक हिंसाचार व हत्या प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा होणार असल्याचा स्पष्ट संदेश समाजात गेला आहे.
