धावत्या ट्रॅक्टरवरून पडून युवकाचा मृत्यू; मलकापूर पांग्रा येथील घटना !
Mar 20, 2026, 12:36 IST
मलकापूर पांग्रा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : येथे धावत्या ट्रॅक्टरवर उभ्या असलेल्या युवकाचा तोल जाऊन तो थेट चाकाखाली सापडल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण अपघातात युवकाचा मृत्यू झाला.
माहितीनुसार, भुमराळा येथून विनानंबर नवीन फार्मट्रॅक कंपनीचा ट्रॅक्टर पेन सांगवीकडे जात होता. पंडित नेहरू विद्यालयासमोरील पुलाजवळ हा अपघात घडला. ट्रॅक्टरच्या चालकाच्या बाजूला उभा असलेला समाधान दळवी (वय अंदाजे ३५, रा. भुमराळा) याचा अचानक तोल गेला आणि तो मधल्या चाकाखाली सापडून काही अंतर फरफटत गेला. या भीषण अपघातात तो गंभीर जखमी झाला.
दरम्यान, जखमी अवस्थेत पडलेल्या दळवी यांना बिबी येथे उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. घटनेची माहिती मिळताच बिबी पोलिसांनी घटनास्थळावर भेट देवून पंचनामा केला. पुढील तपास बिबी पोलीस करीत आहेत.