

पोलिसाचा खून करणाऱ्या आरोपीला बेड्या; खुनाचा गुन्हा दाखल! काल, अंढेरा पोलिस स्टेशन हद्दीत घडली होती घटना...
Mar 24, 2025, 08:45 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दारू विक्रेत्याचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या दुचाकी वाहनाला लाथ मारून पोलिसाचा खून केल्याची घटना काल,२३ मार्चच्या दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली होती. चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ ते मिसाळवाडी दरम्यान घडलेल्या या घटनेतील आरोपी संजय शिवणकर याला घटनेच्या काही तासांतच पोलिसांनी गजाआड केले आहे. या घटनेतील जखमी पोलिस राम आंधळे यांच्या तक्रारीवरून आरोपी संजय शिवणकर याच्याविरोधात अंढेरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंढेरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी राम आंधळे आणि भागवत गिरी शेळगाव आटोळ परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी संजय शिवणकर हा चिखलीकडून शेळगाव आटोळकडे अवैधरित्या दारूचे बॉक्स घेऊन येत होता. भागवत गिरी आणि राम आंधळे यांनी दुचाकीने पाठलाग करून शिवणकरला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवणकरने पोलिसांच्या दुचाकीला लाथ मारली. यात दुचाकी चालवणारे भागवत गिरी रस्त्याच्या कड्याला असलेल्या झाडाला धडकले, त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला होता तर राम आंधळे जखमी झाले होते. राम आंधळे यांच्यावर चिखलीत खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.दरम्यान या घटनेनंतर जिल्हाभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत..पोलिसांनी आरोपी संजय शिवणकरला अटक केली आहे..
एसपी पानसरेंची घटनास्थळी धाव...
दरम्यान या घटनेनंतर जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी महामुनी घटनास्थळी पोहोचले. चिखली येथील खाजगी रुग्णालयात जाऊन जखमी पोलीस कर्मचारी राम आंधळे यांची भेट घेतली. त्यानंतर मृतक पोलीस कर्मचारी भागवत गीरी यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेत आरोपीवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले...