देशी भरमार बंदूक घेऊन जाणारा एकजण अटकेत; एक फरार, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...
Jun 18, 2025, 09:25 IST
सोनाळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दुचाकीवर देशी भरमार बंदूक घेऊन जात असलेल्या दोघांपैकी एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून, दुसरा आरोपी फरार झाला आहे. ही कारवाई टुनकी-सोनाळा मार्गावरील इंगळे पेट्रोलपंपाजवळ १७ जून रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दोन जण दुचाकीवरून भरमार बंदूक घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. तत्काळ सापळा रचत पोलिसांनी दुचाकीला अडवले असता, पिवळ्या रंगाच्या गोणीत लपवून ठेवलेली देशी बनावटीची भरमार बंदूक (किंमत २७ हजार रुपये), ११ छर्रे, गन पावडर तसेच अंदाजे ७० हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण ९७ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी संबंधित आरोपीविरोधात सोनाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक करण्यात आलेल्या आरोपीची चौकशी सुरू आहे. दुसरा आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी व श्रेणिक लोढा यांच्या आदेशावरून, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पोहेकॉ. एजाज खान, पोकॉ. कोमल इंगळे व पोकॉ. निवृत्ती पुंडे यांनी केली. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.