मलकापूर शहर पोलिसांची धडक कारवाई; नाकाबंदीत दोन कारमधून तब्बल ४६.७८ लाखांची रोकड जप्त...
दरम्यान, १८ जानेवारी रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास मुक्ताईनगर रोडकडून येणारी होंडा वेन्यू कार (क्रमांक एमएच २१ बीव्ही ३३७८) थांबवून तपासण्यात आली. वाहनाच्या डिक्कीत पैशांनी भरलेली बॅग आढळून आली. वाहन चालक व मालक जगदीश ताराचंद गिरणीवाले (वय ५८, रा. तांबटकर गल्ली, देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) यांनी पंचासमक्ष झडतीस संमती दिल्यानंतर बॅगेची तपासणी करण्यात आली. त्यात ५०० रुपयांच्या २,४०० नोटा (१२ लाख), २०० रुपयांच्या २,००० नोटा (४ लाख) व १०० रुपयांच्या ४,००० नोटा (४ लाख) असा एकूण २० लाख रुपयांचा रोख साठा आढळून आला. ही रक्कम पंचासमक्ष व्हिडीओग्राफीद्वारे जप्त करण्यात आली.
यानंतर त्याच ठिकाणी मुक्ताईनगर रोडकडून येणारी किया सोनेट कार (क्रमांक एमएच २१ बीक्यू ८४७४) थांबवण्यात आली. या वाहनाच्या डिक्कीतही पैशांनी भरलेली बॅग सापडली. वाहन मालक सलीम खान नईम खान (वय ४१, रा. धाड, ता. जि. बुलढाणा) यांनी झडतीस संमती दिल्यानंतर पंचासमक्ष तपासणी करण्यात आली. या बॅगेत ५०० रुपयांच्या ७६ नोटा (३८ हजार), २०० रुपयांच्या ११,००० नोटा (२२ लाख), १०० रुपयांच्या ४,४०८ नोटा (४ लाख ४० हजार ८०० रुपये) व ५० रुपयांची १ नोट असा एकूण २६ लाख ७८ हजार ८५० रुपयांचा रोख साठा आढळून आला.
अशा प्रकारे नाकाबंदी दरम्यान एकूण ४६ लाख ७८ हजार ८५० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून ही रक्कम पोलीस स्टेशन मलकापूर शहर येथे जमा करून पुढे जिल्हा कोषागार कार्यालय, बुलढाणा येथे वर्ग करण्यात आली आहे. तसेच पुढील तपासासाठी आयकर अधिकारी कार्यालय अकोला, असिस्टंट डायरेक्टर आयकर विभाग अमरावती व सहायक आयुक्त जीएसटी विभाग खामगाव यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर शहर पोलिसांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.
