महाराष्ट्र हादरला! काय उलट्या काळजाचा काळ आला! जन्मदात्या बापाने पोटच्या मुलींना संपवले;

 दोघींनाही फेकले नदीत! खामगाव तालुक्यातील घटना
 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): क्रूरतेचा आणि निर्दयीपणाचा कळस म्हणता येईल अशी घटना खामगाव तालुक्यातून समोर आली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे . जन्मदात्या बापानेच पोटच्या दोन मुलींना नदीपात्रात फेकून दिले एवढेच नाही तर स्वतःच त्या हरवल्याची तक्रार देखील या निर्दयी बापाने पोलिसांना दिली.

खामगाव तालुक्यातील कदमापूर येथील मूळरहिवासी असलेला हा क्रूरकर्मा सासुरवाडी असलेल्या लाखनवाड्यात राहतो. आलिया परवीन (९) सदाफ परवीन (७) अशी मृत झालेल्या चिमुकल्यांची नावं आहेत. शेख हारून शेख शब्बीर ( रा. कदमापुर, हल्ली मुक्काम, लाखनवाडा) असे त्या क्रूरकर्मा निर्दयी बापाचे नाव आहे. 

   
शेख हरून याला चार मुली आहेत. कोणता विचार किंवा कुठला वाद उफाळून आला याचं नेमकं कारण सांगता येणार नाही. सध्या पोलीस कारणाचा तपास करत आहेत. चार मुलींपैकी त्याने आलिया परवीन व सदाफ परवीन या दोघींना बाळापूर जवळ असलेल्या भिकुंड नदीपात्रात फेकून दिले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर संशय येऊ नये म्हणून त्याने मुली हरवल्याची तक्रार हिवरखेड पोलीस ठाण्यात दिली. मात्र पोलिसांना संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी निर्दयी बापाला ताब्यात घेतले, पोलीसी खाक्या दाखवताच निर्दयी बापाने मुलींना नदीत फेकल्याची कबुली दिली.
 
बाळापुर पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या नदीपात्रात त्याने या दोघींना फेकून दिले होते. त्यानंतर यंत्रणा अलर्ट झाली, दोघींचा शोध सुरू झाला. काल शनिवारी रात्री उशिरा या दोघींचे मृतदेह तपास पथकाला सापडले आहेत. या चिमुकल्यांचे मृतदेह पाहून उपस्थितांनाही गहीवरून आले. पण क्रूरकर्मा बापाच्या चेहऱ्यावर मात्र कुठलीही पश्चातापाचे भाव दिसून आले असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
दोन्ही मुलींचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आले आहेत. पोलिसांनी निर्दयी बापाला अटक केली आहे, त्याने खून का केला? याबाबत नेमके कारण अद्याप समोर आले नाही.