जादू मंतर..! काळ्या पैशांचा पाऊस पाडण्यासाठी फॉर्म हाउसवर छुमंतर..! अल्पवयीन मुलीच्या हातून करून घेत होते अघोरी पुजा; मोताळा तालुक्यातील जयपूर येथील प्रकार; पोलिसांनी टाकली धाड...

 
 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पैशांचा पाऊस पाडण्यासह गुप्तधन शोधण्याकरिता जयपूर शिवारातील एका फार्म हाऊसवर पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीच्या हातून अघोरी पूजाअर्चा करणाऱ्या टोळीतील नऊ आरोपींना बोराखेडी पोलिसांनी रंगेहात पकडले. २० मार्चच्या रात्री ११ वाजता ही कारवाई करण्यात आली. जादूटोणा कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेतील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
  यातील मुख्य आरोपी मध्य प्रदेशातील उज्जैनचा तसेच अन्य
 आरोपी पुणे, मलकापूर, मोताळा, धामणगाव धाड येथील रहिवासी आहेत. तसेच आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. आरोपींच्या ताब्यातून एक कार, मोबाइल आणि अघोरी पुजेचे साहित्य असा चार लाख ४१ हजार ४८० हजारांचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
मोताळा तालुक्यातील जयपूर येथे राजेंद्र राठी याच्या शेतातील फॉर्म हाऊसवर २० मार्चचे रात्री काही लोक मांत्रिकासह अघोरी पूजा करण्यासाठी एकत्रित जमणार असल्याची माहिती बोराखेडीचे ठाणेदार पोलीस निरीक्षक सारंग नवलकार यांना मिळाली होती. काही वेळातच कर्मचाऱ्यांसह त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाड घातली. तेथे मांत्रिक गणेश समाधान मोरे (महाकाली मंदिरामागे उज्जैन मध्य प्रदेश) हा पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीकडून पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा करत असल्याचे आढळून आले. घटनास्थळावर लिंबू, नारळ, पिवळी खारीक, हळकुंड, विबे, राळ, हिरवी रंगाची डाळ, रुद्राक्ष दिसून आले. बोराखेडी पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध कलम ३ (२) महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अपिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालणे व त्यांचे समूळ उच्चाटन करणे अधिनियम २०१३ अन्वये गुन्हा दाखल केला. २१ मार्चला मोताळा न्यायालयात हजर केले असता आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलीस बुलढाणा येथील सखी केंद्रात दाखल करण्यात आले.
आरोपींची नावे
गणेश समाधान मोरे (३२, उज्जैन, मध्यप्रदेश), फॉर्म हाऊस मालक राजेंद्र विठ्ठलदास राठी (६०, जयपूर ता. मोताळा), नितीन विठ्ठल गायकवाड (२८, पिंप्री चिंचवड पुणे), दीपक सुधाकर सुपे (४८, बोदवड ह.मु. पुणे), अमर रमेश पिजरकर (४५, हनुमाननगर, मलकापूर), रत्नदीप माधोरराव पाटील (४५, कृष्णानगर पिंप्री चिंचवड पुणे), मनोज सुधाकर मुधोळकर (५०, नसवाला चौक मलकापूर), रमा नीलेश आखाडे (२५, अंजमनगर करमॅक्स चौकाजवळ पिंप्री निगडी ता. पिंप्री चिंचवड, पुणे) व कोमल रमेश गायकवाड (२७, अजिंठानगर टीसीआय कंपनीजवळ पिंप्री चिंचवड, पुणे).
अवघ्या काही क्षणातच पर्दाफाश
घटनेची माहिती समजताच ठाणेदार सारंग नवलकार यांनी क्षणाचा विलंब न करता अवघ्या काही मिनिटांतच घटनास्थळ गाठून या टोळीचा पर्दाफाश केला. एपीआय बालाजी शेंगेपल्लू, पीएसआय राजेंद्र कपले, प्रवीण पडोळ, सुनील भवटे, मनोहर पंडित, नंदकिशोर धांडे यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली....