जगणे महाग अन् मरण झालंय स्वस्त..? जिल्ह्यात दोन तरुणांच्या आत्महत्या; एकाने कर्जापायी आवळला गळफास, दुसरा अवघा २१ वर्षांचा ..

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अलिकडच्या काळात जिल्ह्यात आत्महत्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. दोन दिवसांपूर्वीची २७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आता आणखी दोन आत्महत्येच्या घटना समोर आली आहे. चिखली तालुक्यातील मेरा बु येथे कर्जबाजारी युवकांनी आत्महत्या केली. दुसरीकडे नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे २१ वर्षीय  तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले..हल्लीच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटना पाहता जगणे महाग अन् मरण स्वस्त झाले की काय अशी परिस्थिती आहे..

  अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या  नारायणखेड येथील नरहरी उर्फ बालू सीताराम बनसोडे याच्यावर बँकेचे १ लाख व ग्रामीण कुटा मायक्रो फायनान्स चे १ लाख रुपयांचे कर्ज होते. शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने कर्ज कसे फेडावे याची चिंता नारायण यांना होती. या विवंचनेतून त्यांनी शेतात करंजीच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेतला.. अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.पुढील तपास पोलीस करीत आहेत..

  दुसरी घटना नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील आहे. निमगाव येथील दिपक उर्फ हरिओम आनंदा धुळे या २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेतला. घरातील तीन पत्राच्या खाली असलेल्या बल्लीला ओढणीच्या सहाय्याने दिपकने गळफास घेतला. अवघ्या २१ व्या वर्षी दिपकने टोकाचा निर्णय का घेतला? याबद्दल नेमकी माहिती अद्याप समोर आली नाही. तपास नांदुरा पोलिस करीत आहेत..