बुलढाण्याच्या विदर्भ हाउसिंग सोसायटी मधील "त्या" मर्डर प्रकरणात जन्मठेप! रक्षाबंधनाच्या आधीच केला होता भावाने सख्ख्या बहिणीचा खून;म्हणे, बहिणीमुळे होते बदनामी...

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २०२० च्या जुलै महिन्यात रक्षाबंधनाला अवघे चार-पाच दिवस बाकी असताना बुलढाण्याच्या विदर्भ हाउसिंग सोसायटीमध्ये एक खळबळजनक घटना घडली होती. भावा बहिणीच्या प्रेमळ नात्याला डंक लावणाऱ्या त्या घटनेने केवळ बुलडाणा शहरच नव्हे तर अख्खा जिल्हा सुन्न झाला होता. सख्ख्या भावाने सख्ख्या बहिणीचा खून केला होता..बहीण दारू पिते,व्यसन करते त्यामुळे समाजात बदनामी होत असल्याचा भाऊ सागर शर्मा याचा आरोप होता..याच रागातून त्याने सख्ख्या बहिणीचा केबल ने आवळून खून करीत तिचा मृतदेह बाथरूम मध्ये ठेवला होता. या प्रकरणात न्यायदेवतेने आपले कर्तव्य चोख बजावत आरोपी भावाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने काल,१२ जूनला हा निकाल दिला. विशेष सरकारी वकील व्ही.एल.भटकर यांनी या प्रकरणात सरकारी पक्षाच्यावतीने युक्तिवाद केला होता.

आरोपी सांगत त्र्यंबक शर्मा याने त्याची २८ वर्षीय सख्खी बहिण अंकिता हिची हत्या केली होती. अंकिताला दारू पिण्याचे व्यसन असल्यामुळे समाजात आणि मित्रमंडळीत बदनामी होत असल्याचा राग त्याच्या मनात होता. याच रागातून त्याने आधी आई व अंकिता च्या मुलांना घराबाहेर काढून दिले. त्यानंतर केबलने गळा आवळून अंकिताचा खून करून तिचा मृतदेह घराच्या बाथरूम मध्ये ठेवला होता. याप्रकरणी सागरच्या आईने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सुनावणीला सुरुवात झाली होती. न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड समितीच्या कलम ३०२ नुसार जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आरोपीला सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.