सारोळा मारुती शिवारात बिबट्याचा कहर! गोठ्यात घुसून ७ शेळ्यांचा फडशा; परिसरात भीतीचं वातावरण

 
 मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – वन्यजीवांचा दिवसेंदिवस वाढणारा वावर आता शेतकऱ्यांच्या जीवावर बेतू लागला आहे. सारोळा मारुती शिवारात सोमवारी (७ एप्रिल) मध्यरात्री बिबट्याने गोठ्यात घुसून सात शेळ्यांचा फडशा पाडला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
भरत हरी सुरोशे यांच्या गट क्र. ११७ मधील शेतात टिनशेड गोठा तयार करून शेळ्या ठेवण्यात आल्या होत्या. रात्री सुमारे १२ वाजता बिबट्याने तारेच्या कुंपणातून प्रवेश करून थेट गोठ्यातील शेळ्यांवर हल्ला केला. सकाळी गोठ्यात हालचाल न दिसल्याने शेतकऱ्यांनी पाहणी केली असता, मृत शेळ्या आणि रक्ताने माखलेला परिसर पाहून धक्का बसला. एक शेळी गंभीर जखमी आहे.
ही माहिती मिळताच रोहीणखेड बीटचे वनपाल एस. एच. जगताप, वनरक्षक आर. बी. शिरसाट आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कोकाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 
ग्रामस्थांच्या मते, जानेवारीपासून या भागात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून आतापर्यंत एकूण १३ शेळ्या आणि ३ कुत्र्यांचा बळी बिबट्याने घेतला आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.