खामगाव-चिखली रोडवर दुर्दैवी घटना : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

 
 खामगाव (भागवत राऊत : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)– खामगाव-चिखली रस्त्यावर मोहाडी गावाजवळ आज पहाटे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता पार करत असलेला बिबट्या ठार झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास बिबट्या रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यावर त्यांनी तत्काळ वनविभागाला कळवले.
माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. प्रारंभीच्या अंदाजानुसार, मृत बिबट्या पाच ते सहा वर्षांचा असून त्याचे वजन सुमारे साठ किलो असावे, असे सांगण्यात आले.
सदर बिबट्याचे शवविच्छेदन करण्यासाठी त्याला शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून वन्यजीवांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर पुन्हा चर्चा रंगू लागली आहे.
वनविभागाकडून पुढील तपास सुरू असून, संबंधित वाहनाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.